महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा युवा पुरस्काराने
प्रताप मेटकरी यांचा गौरव
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दिल्या जाणाऱ्या सन 2016 - 17 च्या जिल्हा युवा पुरस्काराने दैनिक जनप्रवासचे खानापूर तालुका प्रतिनिधी प्रताप दत्तात्रय मेटकरी यांना पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर झालेल्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण झाले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, महापौर गीता सुतार, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, अतिरीक्त जिल्हा पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले, जिल्हा क्रिडाधिकारी माणिक वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, मिरज पोलीस उपविभागीय अधिकारी संदीपसिंह गिल, पद्मश्री विजयकुमार शहा यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
जिगरबाज धडाडीचे उमदे युवा पत्रकार आणि दैनिक जनप्रवासचे खानापूर तालुका प्रतिनिधी प्रताप मेटकरी यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. खानापूर तालुक्यातील एक जिगरबाज, ध्येयवादी, कष्टाळू आणि ध्येयवादी पत्रकार म्हणून प्रताप मेटकरी यांची ओळख आहे. दैनिक जनराज्य, जनप्रवास, लोकमत, सकाळ आणि पुन्हा जनप्रवास अशी तबबल गेल्या 13 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत आपल्या लेखणीच्या माध्यमातून आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून आपली जबाबदारी आणि कर्तव्ये योग्य प्रकारे पार पाडत सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आवाज उठविण्याचे काम करण्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा हिरीरीने सहभाग असतो. आपण ज्या समाजात वावरतो त्या समाजाचे काहीतरी देणं लागतो ही भावना जपत त्यांनी आजवर विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय योगदान दिले आहे. सत्य व वास्तव आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच महिला, बेरोजगार युवक, गोरगरीब आणि उपेक्षितांचा आवाज बुलंद करण्यासाठी लेखणीच्या माध्यमातून सकारात्मक पत्रकारिता करत आहेत. रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबीर, व्यसनमुक्ती, बेरोजगाराना मार्गदर्शन, युवक मेळाव्याचे आयोजन, मुलीच्या जन्माचे स्वागत, महिला मेळावा, राष्ट्रीय एकात्मता, वाहतूकीचे नियम जनजागृती करण्याबरोबरच सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) च्या माध्यमातून खानापूर तालुक्यातील महाविद्यालयीन युवकांचे संघटन करून विविध अभिनव उपक्रम यशस्वीरित्या राबविलेले आहेत. युवकांसाठी रोजगाराभिमुख अभ्यासक्रम व्हावा, स्त्री जन्माचा सन्मान, विविध क्षेत्रातील यशस्वी युवकांच्या मुलाखती याविषयावर त्यांनी वृत्तपत्रातून लेखन केलेले आहे.
प्रताप मेटकरी यांनी आजवर सामाजिक क्षेत्रासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली यांच्या वतीने जिल्हा युवा पुरस्काराने त्यांना पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे.