*पै. चंद्रहार पाटील, तुम्हीच बरोबर होता की काय असा प्रश्न पडतो !*
*दत्तकुमार खंडागळे*, संपादक वज्रधारी, मो. 9561551006
सामान्य माणसावर ज्यावेळी अन्याय होतो तेव्हा तो निमुटपणे सहन करत असतो. त्याला प्रतीउत्तर देण्याची त्याच्यात धमक नसते. तो चिरडत, चरफडत आणि दबत जगतो पण त्याच्या आतल्या आत तो धुमसत असतो. अन्याय-अत्याचाराविरूध्दची चिंगारी त्याच्या अंत:करणात भडकत असते. त्याच्यातली ठिणगी सतत पेटत असते. तो प्रतिकार करत नसला तर आतली ठिणगी मात्र फुलारत असते. अन्यायी व्यवस्थेला उत्तर देण्याची, चँलेंज करण्याची ताकद नसल्याने तो अत्याचार सहन करतो पण याचा अर्थ असा नसतो की त्याला हे अन्याय-अत्याचार मान्य असतात. त्याच्यावर जर सतत अन्याय होत राहिले तर त्यांच्यातूनच कुणीतर त्या सर्वांचा आवाज बुलंद करत उभा रहातो आणि बंड पुकारतो. त्याची जशी जडणघडण असेल, त्याची जशी कुवत असेल तसे त्याचे बंड व्यक्त होते. त्यानुसार माणसं घडत असतात. त्याला सतत ठेचणा-या व्यवस्थेला तो फणा काढून आव्हान देतो. त्याला शक्य असेल तर तो डसतो आणि त्याचा बदला घेतो. इतिहासात हे अनेकवेळा घडलय. सामान्य माणूस चवताळून उठल्याचे अनेक दाखले इतिहासाच्या पाना-पानावर आहेत. रयतेवर होणारा अत्याचार पाहून एका सरदाराचे बारा-चौदा वर्षाचे पोरं समोर येते आणि छत्रपती होते. दक्षिण आफ्रिकेत रेल्वेतून फेकलेला मोहनदास गांधी पुढे जावून महात्मा गांधी होतात. कुणाचे बंड किती विधायक किंवा उदात्त यावर त्याची जडणघडण होते. मग कुणी महात्मा, महापुरूष होतो तर कुणी विधायक गुंड म्हणून ओळखला जातो. पण ही माणसं जनतेच्या मनावर राज्य करतात. जेव्हा माणसाच्या आत्मसन्मानावर आणि स्वाभिमानावर अन्यायी-अत्याचारी व्यवस्थचे हल्ले होतात तेव्हा तो चवताळून उठतो. त्याला जितका चिरडला जातो, दाबला जातो तेवढाच तो उसळतो. तो चवताळण्याची आणि उसळण्याची प्रक्रिया सावकाश असते पण ती घडते नक्की. याची उदाहरणे प्रतिनिधीक असतात. कधी बोरगावचा ढाण्या वाघ म्हणून बापू बिरू वाटेगावकर जन्माला येतात तर कधी तांबव्याचे विष्णू बाळा पाटील जन्माला येतात. म्हणून तर चित्रपटातला अँग्री यंग मँन लोक डोक्यावर घेतात. म्हणूनच लोकांना मुळशी पँटर्नमधला भांडवलदारांना ललकारणारा राहूल्या भावतो. "ओ साहेब ! तुम्ही आम्हाला घोडे लावले ना, आम्ही तुम्हाला बैल लावू बैल !! असे अत्याचारी व्यवस्थेला आव्हान देणारा राहूल्या गुंड असला तरी लोकांना आवडतो. जेव्हा जेव्हा राज्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकारी मिळून जनतेचा आवाज चिरडतात, दडपतात, सत्याच्या छाताडावर असत्याचा झेंडा रोवतात तेव्हा त्याच दबलेल्या जनतेतून अशी बंडखोर माणसं जन्माला येतात. राजकीय सत्तेच्या आणि प्रशासनाच्या बदफैली व्यभिचारातून ही माणसं जन्माला येतात. हिच माणसं परत या मुजोर, भ्रष्ट व अत्याचारी व्यवस्थेला भिडतात. ती मोडून काढण्यासाठी त्यांच्या कुवतीनुसार लढा उभारतात. मस्तवाल कंसाच्या अत्याचारी व्यवस्थेचे उत्तर म्हणजे कृष्ण असतो. तो सत्तेच्या जोरावर माजलेल्या कंसाचा विनाश करतो. कंसाच्या झिंज्या पकडून त्याला फरपटत आणून सत्ताच्युत करतो. ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. कुणाचेच सत्तेचे किंवा अधिकाराचे ताम्रपट नसतात. या निसर्गात सगळ्याचा आणि सगळ्यांचा क्षय होतो, अस्त होतो. इथे कुणी अजरामर होत नाही. आजवर अनेकांच्या सत्ता आणि साम्राज्ये पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळलेली आहेत. याचे भान प्रत्येकालाच असायला हवे.
खानापुर तालुक्यातील करंजे येथील लोकांच्या रस्ता मागणी प्रकरणी हेच चित्र दिसते आहे. लोक सत्तर वर्षे न्यायासाठी झगडत आहेत. त्यांची न्याय्य मागणी आहे पण प्रशासन आणि सत्ता मिळून या मागणीला कोलदांडा घालत आहेत. राजकीय सत्तेचा आणि प्रशासनाचा खुलेआम व्यभिचार सुरू आहे. प्रशासनातले अधिकारी सत्तेच्या गाडीचे बैल झालेले दिसत आहेत. सत्ता म्हणेल तसे हे नंदीबैलासारखे माना डोलवत आहेत. कायदा व नियम फाट्यावर मारून सत्ताधिशांना खुष करत सत्य दडपताना दिसत आहेत. खरेतर कायदा-व्यवस्थेचे पालन करणे, त्याची काटेकोर अंमलबजावणी करणे हे त्यांचे प्राथमिक व परम कर्तव्य पण त्यांनी या कर्त्यव्याला आग लावलेली दिसते आहे. या लोकांना पगार जनतेचा असतो. हे जनतेचे नोकर असतात पण वास्तवात हे अधिकारी सत्तेचे गुलाम झालेले दिसतात. सत्ता सांगेल ते सत्य मानत असतात. लोकांच्या सेवेपेक्षा नेत्यांची चाकरी करताना दिसतात. सत्याला आणि कर्तव्याला सामोरं जायची कुवत यातल्या एखाद्याही मायच्या लाल मध्ये दिसत नाही. अंगावर अधिकारपदाची झुल पांघरलेले हे नंदीबैल पाहिले की किळस येते. माणूस इतका हरामखोर, इतका बेइमान कसा असू शकतो ? हा प्रश्न पडतो. याला काही अपवाद आहेत. चांगले अघिकारीही आहेत पण त्यांचे प्रयत्न अपुरे पडतात. या लांडग्यांच्या झुंडी सर्वत्र फैलावल्या आहेत. त्यात प्रामाणिक आणि चांगल्या अधिका-यांची अडचण होते. या प्रशासनातल्या व राजकारणातल्या लोकांच्यात सत्याला सत्य म्हणायची धमक व ताकद दिसत नाही. तेवढी नैतिकता, तेवढी इमानदारी त्यांच्यात नाही. जनतेच्या सेवेची झुल अंगावर घेतलेले हे लोक सत्तेचे गुलाम झालेले आहेत. विकलेले आणि गुलाम झालेले हे लोक सत्य, कायदा आणि नियम पायदळी तुडवून असत्याला सत्य भासवू पाहत आहेत. हे सगळं चित्र पाहून असा प्रश्न पडतो की, जनतेच्या सेवेसाठी निर्माण केलेल्या या प्रशासकीय इमारती आहेत की पैशाच्या आणि सत्तेच्या धाकावर विकले जाणारे कुंटनखाने आहेत ? सत्तेचे गुलाम झालेले हे लोक सत्य बदलण्यासाठी पाहिजे ते करू पाहतायत. या पुर्वीच्या तहसिलदारांनी, प्रांतांनी व जिल्हा न्यायालयांनी दिलेला निकाल रातोरात बदलण्याचे कारस्थान केले जाते आहे. तो चुकीचा ठरवण्याचे उद्योग केले जात आहेत. स्वत:चेच निर्णय बेमालूमपणे फिरवले जातात. ज्यांची न्याय मागणी आहे त्यांनाच नियम व कायदा शिकवला जातोय. हे सारं चित्र व्यथीत करणारं आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून चौ-याहत्तर वर्षे झाली पण त्याचा सामान्य जनतेला काय उपयोग झाला ? सामान्य माणूस रोज सत्तेच्या टाचेखाली चिरडला जातोय, भरडला जातोय. अन्यायी व अत्याचारी व्यवस्थेतल्या या देशी औलादी पाहिल्यावर असं वाटतं की या स्वकीय अत्याचारी व्यवस्थेपेक्षा इंग्रज परवडले.
काही दिवसापुर्वी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी विट्याच्या तहसिलदारांच्या मुस्काडात मारली होती. प्रशासनातल्या हरामखो-या, लबाड्या पाहिल्यावर चंद्रहार पाटीलच बरोबर होते का ? त्यांनी उचललेले पाऊल योग्य होते का ? असा प्रश्न पडतो. कायदा हातात घेणे योग्य नाही. कुणावर हात उचलणे योग्य नाही पण ती वेळ आणली जात असेल तर लोक काय करणार ? माणसाला गुन्हा करायला मजबूर केले जात असेल तर काय करणार ? प्रत्येकाने कायद्याचा सन्मानच करायला हवा पण कायद्याचे रखवालदार जर सत्तेच्या दावणीचे नंदीबैल होवून स्वत:च कायदा पायदळी तुडवत असतील, लोकांना व त्यांच्या न्याय्य मागणीला चिरडत असतील तर लोक का मुस्काड फोडणार नाहीत ? का चवताळूण उठणार नाहीत ? कायद्याची कवचकुंडलं घालून लोकांची सेवा करायची आहे सत्तेची चाकरी नव्हे. शासन आणि प्रशासन लोकांना बांधील असते. लोकांच्या नोकरांनी मालकांवर पाय टाकू नयेत अन्यथा मग कुणी चंद्रहार होतो, कुणी बापूबिरू होतो, कुणी विष्णूबाळा होतो तर कुणी महात्मा गांधी होतो. ही सगळी व्यक्तीमत्व या व्यवस्थेनेच जन्माला घातली आहेत. करंजे येथील रस्त्यासाठी संघर्ष करणा-या लोकांना सत्तर वर्षे दाबले आणि दडपले जात असेल तर भविष्यात त्यांच्यातल्याच एखाद्या पोराने कायदा फाट्यावर मारत वैतागाने शस्त्र उचलले आणि या दलालांच्या छाताडात खुपसले तर ? दडपलेली लोकं ज्या वेळी उसळतात तेव्हा ती कुठल्याही थराला जातात. सत्तर वर्षे न्याय मार्गाने प्रश्न सुटत नसेल, कायदेशीर मार्गाने न्याय मिळत नसेल तर माणूस बेकायदेशीर व अन्यायी मार्ग चोखाळतो. कायदेशीर, सनदशीर वाटा ज्यावेळी बंद होतात तेव्हाच माणूस बेकायदेशीर वाटा धुंडाळतो. करंजे रस्ता प्रकरणात सनदशीर मार्गाने रस्ता मागणा-या लोकांना दडपणारी व्यवस्था याचीच वाट पहातेय की काय ? सनदशीर मार्गाने न्याय मागणा-या लोकांनी उठावे आणि बेकायदेशीर मार्ग चोखाळावेत हिच या व्यवस्थेची इच्छा आहे काय ? या व्यवस्थेला चंद्रहार जन्माला घालायचा आहे की बापू बिरू जन्माला घालायचे आहेत ? या निमित्ताने असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही.