विवेकानंद नगर येथे शॉक लागून मुलगी गंभीर
विजेचा धक्का बसलेल्या चिमुरडीला वाचवण्यासाठी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांची धडपड
विवेकानंद नगर येथील सागर गॅरेज शेजारील अपार्टमेंट मधील सुनील धुमाळ यांची मुलगी अदिती ही गॅलरी मध्ये झाडू मारत असताना गॅलरी शेजारून गेलेल्या महावितरणच्या तारांचा शॉक लागल्याने गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी विटा येथील खाजगी रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी सांगलीला घेऊन जाण्यास सांगितले. तिला पुढील उपचारासाठी सांगलीतील रुग्णालयात नेण्यात आले आहे.
नेमकी काय घटना घडली?
वेळ सकाळी नऊची, डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील आपल्या कामकाजा निमित्त विटा येथील कराड रोड वरती विवेकानंद नगर परिसरामध्ये अमृता ट्रेडिंग या ठिकाणी थांबले होते, यावेळी अचानक विटा कराड रोड लगत असणाऱ्या एका पत्र्याच्या शेड वरती काहीतरी पडल्याचा जोराचा आवाज झाला. यावेळी पैलवान चंद्रहार पाटील यांनी तत्परतेने त्या ठिकाणी धाव घेतली त्यावेळी आदिती सुनिल धुमाळ ही आठ वर्षाची मुलगी गॅलरीमधून खाली बांधण्यात आलेल्या शेड वरती पडली होती त्याचवेळी तिला शेड वरून गेलेल्या विजेच्या तारा चा जोरदार धक्का बसला होता व ती निपचित पडली होती. पैलवान चंद्रहार पाटील यांनी अतिशय तत्परतेने तिला आपल्या गाडीमध्ये घेतले व स्वतः ड्रायव्हिंग करत त्या मुलीला हॉस्पिटलमध्ये पोहोच केले. आदिती धुमाळ या मुलीला वेळेत प्राथमिक उपचार मिळाले वय कमी असल्याने व विजेचा जोरदार धक्का बसल्याने तिला पुढील उपचारासाठी सांगलीला हलविण्यात आले.
डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे या मुलीला वेळीच उपचार मिळाले.