आईच्या रक्षा विसर्जनानंतर संपूर्ण कुटुंबीयांनी केले स्वतःहून होमक्वारंटाईन.
भाळवणी येथील कुलकर्णी कुटुंबियांचा सामाजिक आदर्श.
भाळवणी - भाळवणी ता. खानापूर येथील सुलोचना सुधाकर कुलकर्णी यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. सुशिक्षित, कुटुंबवत्सल, प्रेमळ, जुनी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सुलोचना काकींच्या अचानक जाण्याने त्यांच्या परिवाराबरोबरच, आप्तेष्ट व नातेवाईकांना मोठा धक्का बसला. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांचे भाळवणी येथील घरी ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. कोरोना च्या पार्शवभूमी वर अंत्यविधीसाठीच्या सर्व नियमांचे कुलकर्णी कुटूंबियांनी काटेकोरपणे पालन करून सोशल डिस्टन्शन पाळून सर्व विधी त्यांनी यावेळी पूर्ण केले. त्यानंतर सुद्धा त्यांनी भाळवणी गावासाठी नेमून दिलेले आरोग्य अधिकारी प्रमोद पाटील भेटले नंतर, आम्ही स्वतःहून होमक्वारंटाईन होणार असल्याचे बोलून दाखवले. आरोग्य अधिकारी प्रमोद पाटील यांनी त्यांना योग्य मार्गदर्शन व सूचना करून होमक्वारंटाईन केले व सामाजिक सुरक्षेसाठी कुलकर्णी कुटुंबीयांनी स्वतःहून घेतलेल्या या खबरदारीची प्रशंसा केली.
सुलोचना कुलकर्णी (काकी) यांच्यामागे पती, दोन मुले, चार मुली, सुना, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे. सर्वजण उच्चशिक्षित आहेत तसेच शिक्षक व विविध पदावर कार्यरत आहेत. पती श्री.सुधाकर कुलकर्णी निवृत्त ग्रामसेवक आहेत. एवढा मोठा परिवार असूनही अंत्यविधी व रक्षा विसर्जनासाठी मोजकेच लोक उपस्थित ठेवून कुलकर्णी कुटुंबीयांनी सामाजिक सुरक्षेचे भान राखून व स्वतःहून कुटुंबीयांना होमक्वारंटाईन करून एक आदर्श निर्माण केला आहे.
कैलासवासी सुलोचना काकी व सर्व कुटुंबीय गोंदवले येथील श्रीब्रह्मचैतन्य महाराजांचे अनुयायी असल्याने भाळवणी व परिसरातील कोरोनाचे सावट दूर व्हावे तसेच काकींच्या आत्म्याला चिरशांती लाभावी यासाठी होमक्वारंटाईन काळात श्री राम नामाचा जप संकल्प केला आहे.
श्रीराम फायनान्स चे पश्चिम महाराष्ट्राचे झोनल मॅनेजर किरण कुलकर्णी यांच्या त्या आई होत्या.